हा ब्लॉग शोधा
रहस्यरंग:जीवनाच्या विविध रंगांचा वेध! नमस्कार! रहस्यरंगमध्ये आपले स्वागत! जगातील उघड आणि गूढ पैलूंवर प्रकाश टाकणारा हा ब्लॉग आहे. राजकारण, समाज, इतिहास, धर्म, विज्ञान आणि प्रेरणादायी व्यक्तींच्या कथांमधून जीवनाचे विविध रंग उलगडणारे विचारप्रवर्तक लेख येथे वाचायला मिळतील. चला, या ज्ञानमय प्रवासात एकत्र सहभागी होऊया!
वैशिष्ट्यीकृत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
संघर्ष आणि प्रकाशाची कहाणी
![]() |
आज जागतिक शिक्षक दिन.जगाच्या इतिहासात काही गुरू-शिष्यांच्या जोड्या अशा आहेत, ज्यांच्या कहाण्या केवळ प्रेरणा देत नाहीत, तर मानवी इच्छाशक्तीची आणि निस्वार्थ त्यागाची अजरामर साक्ष देतात. अशीच एक अतुलनीय कहाणी म्हणजे शिक्षिका एना सुलिव्हॅन आणि त्यांची असामान्य विद्यार्थिनी हेलेन केलर यांची. हेलेन केलर यांनी अंधत्व आणि बहिरेपणावर मात करून जगात जे यश संपादन केले, त्याचे संपूर्ण श्रेय त्यांच्या कठोर, पण प्रेमळ गुरूला, म्हणजेच एन सुलिव्हॅन यांना जाते.
एना सुलिव्हॅन यांचे आयुष्य एखाद्या खडबडीत दगडासारखे होते, ज्याला कालांतराने निस्वार्थ सेवाभावामुळे पैलू पडले.
एना यांचा जन्म १८६६ साली अमेरिकेत एका अत्यंत गरीब घरात झाला. त्यांचे बालपण हे सुखाचे नसून, फक्त हालअपेष्टांनी भरून होते. वडील सतत दारूच्या नशेत असत, तर आई दीर्घकाळापासून आजारी होती. आईच्या निधनाने त्यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. वयाच्या दहाव्या वर्षीच आईच्या निधनाचा धक्का त्यांना सहन करावा लागला.
या दुर्दैवावर कळस म्हणजे, अवघ्या पाचव्या वर्षी 'ट्रॅकोमा' नावाच्या गंभीर आजाराने त्यांची दृष्टी अंशतः हिरावून घेतली. डोळ्यांच्या अनेक वेदनादायक शस्त्रक्रिया करूनही त्यांची दृष्टी पूर्णपणे परत आली नाही. आईच्या मृत्यूनंतर, एना आणि त्यांच्या लहान भावाला 'टीक्सबरी अल्महॉउस' नावाच्या शासकीय अनाथालयात दाखल करण्यात आले. हे अनाथालय म्हणजे रोगराई, गरिबी आणि वाईट परिस्थितीचे माहेरघर होते. इथे त्यांना अत्यंत खडतर जीवन जगावे लागले आणि याच काळात त्यांच्या लहान भावानेही जगाचा निरोप घेतला. या सर्व दुःखाच्या गर्तेतून बाहेर पडून जगाला एक नवीन दिशा देणारी महान शिक्षिका भविष्यात जन्माला येईल, याची कल्पनाही कोणाला नसेल.
या सर्व दुःखांवर मात करून,एना सुलिव्हॅन यांनी 'परकिन्स इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड' (Perkins Institute for the Blind) मध्ये प्रवेश घेतला. अंधांसाठी असलेल्या या संस्थेने त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली. इथेच त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि त्यांच्यातील उपजत शिक्षिकेची क्षमता जगासमोर येण्यास तयार झाली. आपल्याच आयुष्यात आलेल्या अंधारातून त्यांना कळून चुकले होते की, प्रकाशाचा अर्थ काय असतो.
शिक्षण पूर्ण होताच, अवघ्या वीस वर्षांच्या एना सुलिव्हॅन यांना एका अशक्यप्राय कार्याची जबाबदारी मिळाली - ती म्हणजे हेलेन केलर या सहा वर्ष वय असलेल्या मुलीला शिकवण्याची.
हेलेन केलर जन्मजात अंध आणि बहिऱ्या होत्या. त्यांचे जग पूर्णपणे अंधारमय आणि निःशब्द होते. इतक्या लहान वयात कोणाशीही संपर्क साधता येत नसल्याने, त्यांची अवस्था एका जंगली आणि हिंसक झाली होती. त्या अत्यंत हट्टी, चिडचिडे आणि अनुशासनहीन होत्या. त्या वस्तू फेकून देत, मारामारी करत आणि कोणाचेही बोलणे ऐकत नसत. हेलेनसोबत संवाद साधणे, शिष्टाचार शिकवणे तर दूरच, साधे तिच्या जवळ जाणेही कठीण होते.
जेव्हा एना सुलिव्हॅन हेलेनच्या घरी आल्या, तेव्हा त्यांना जाणवले की हे काम केवळ कठीण नाही, तर जवळपास अशक्य आहे. हेलेनने सुरुवातीला एना यांना प्रचंड विरोध केला. मात्र,एना यांनी प्रचंड संयम आणि सहनशीलता दाखवली. हेलेनच्या वाईट सवयी मोडण्यासाठी आणि तिला शिस्त लावण्यासाठी एना यांनी एक कठोर पण आवश्यक निर्णय घेतला हेलेनला तिच्या कुटुंबापासून काही काळ दूर, एका छोट्या घरात विलगीकरणात (Isolation) ठेवले.
या काळात एना यांनी पूर्णवेळ हेलेनसोबत राहून, तिच्या प्रत्येक हट्टाला आणि रागाला शांतपणे सामोरे जावे लागले. हेलेन चिडली, तेव्हा त्यांनी तिला मिठी मारली; तिने वस्तू फेकल्या, तेव्हा त्या पुन्हा उचलल्या. हा संघर्ष फक्त दोन व्यक्तींमधील नव्हता, तर सहनशीलता आणि हट्टीपणा यांच्यातील होता. एना सुलिव्हॅन यांनी एका क्षणासाठीही हार मानली नाही. त्यांचा विश्वास होता की, या अंधाऱ्या जगात कुठेतरी संवादाची एक छोटीशी खिडकी नक्कीच उघडेल.
एना सुलिव्हॅन यांच्या अथक आणि कठोर प्रयत्नांना यश येण्यासाठी अजून एक चमत्कारिक क्षण अपेक्षित होता.
ती ऐतिहासिक सकाळ उजाडली. एका नळजवळ हेलेनला घेऊन जाताना, एना यांनी एक युक्ती केली. त्यांनी एका हातावर थंडगार पाणी ओतले आणि त्याच क्षणी दुसऱ्या हाताच्या तळहातावर बोटांनी 'W-A-T-E-R' (पाणी) हा शब्द स्पेल (Spelled) केला. हेलेनला हा खेळ पहिल्यांदा कंटाळवाणा वाटला, पण एनाने तोच क्रम पुन्हा-पुन्हा सुरू ठेवला.
अचानक, एका क्षणात हेलेनच्या चेहऱ्यावर तीव्र भावनांचे वादळ उठले. तिच्या निष्प्राण डोळ्यांमध्येही एक चमक दिसली. तिला समजले होते! तिच्या हातावर पडणारे 'पाणी' आणि एनाच्या बोटांनी स्पेल केलेला 'W-A-T-E-R' हा शब्द, या दोन गोष्टींमध्ये अर्थपूर्ण संबंध आहे, हे तिला कळून आले. हा तिच्या आयुष्यातील केवळ पहिला 'अर्थपूर्ण संवाद' नव्हता, तर जगाशी जोडले जाण्यासाठीचा पहिला पूल होता.
या क्षणामुळे हेलेनच्या ज्ञानाची कवाडे उघडली. ती भूकेली असल्यासारखी शब्द शिकू लागली. पुढील काही तासांत आणि महिन्यांत तिने शेकडो शब्द, ब्रेल लिपी आणि अनेक विषय वेगाने आत्मसात केले. हेलेन केलरसाठी, एना सुलिव्हॅन ह्या फक्त शिक्षिका नव्हत्या, तर त्या जगातील प्रत्येक शब्दाचा अर्थ घेऊन आलेल्या दूत होत्या.
एना सुलिव्हॅन यांचा त्याग आणि निष्ठा इथेच थांबली नाही. त्यांनी हेलेनच्या सोबत मृत्यू पर्यंत राहून तिला केवळ शिक्षणच नाही, तर आयुष्य जगण्याची कला शिकवली.
एना यांच्या मदतीने हेलेनने उच्च शिक्षण पूर्ण केले आणि रॅडक्लिफ कॉलेजमधून पदवी मिळवणारी पहिली अंध-बहिरी व्यक्ती म्हणून जगात आपले नाव कमावले. हे केवळ शैक्षणिक यश नव्हते, तर मानवी मर्यादांना आव्हान देणारा एक वैश्विक विजय होता.
पदवी मिळवल्यानंतर हेलेन केलर एक प्रसिद्ध लेखिका, राजकीय कार्यकर्त्या आणि व्याख्यात्या बनल्या. त्यांनी अंध आणि अपंगांसाठी जगभर काम केले, ज्यामुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळाली. हेलेन जिथे जिथे जायची, तिथे एना सुलिव्हॅन भाषांतरकार (Interpreter) आणि आधारस्तंभ म्हणून तिच्यासोबत असायच्या. हेलेनचे जागतिक स्तरावरचे यश हे एना सुलिव्हॅन यांच्या अतुलनीय त्याग आणि निस्वार्थ गुरु-निष्ठेचे प्रतीक आहे.
एना सुलिव्हॅन या खऱ्या अर्थाने एक महान आणि निस्वार्थी 'गुरुमाऊली' होत्या. त्यांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यातील हालअपेष्टांवर मात केली आणि एका अशक्यप्राय विद्यार्थ्याला अंधारातून काढून जगामध्ये सन्मानाचे आणि प्रकाशाचे स्थान मिळवून दिले.
आजही, जेव्हा कधी शिक्षकाच्या योगदानाबद्दल बोलले जाते, तेव्हा एना सुलिव्हॅन यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ही कहाणी आपल्याला शिकवते की, शिक्षण हे केवळ पुस्तकांचे ज्ञान नसून, ते धैर्य, प्रेम आणि निष्ठा या मूल्यांचे प्रतीक आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
आसाराम बापू: एक दारु तस्करापासून १०,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत ते थेट तुरुंगापर्यंतची कहाणी!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सती प्रथा: एक क्रूर परंपरेचा अंत आणि आठवणींचा दाह
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा