मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

गगनाला गवसणी

  बुर्ज खलिफाचा अद्वितीय विक्रम आणि मानवी महत्त्वाकांक्षेच्या मर्यादा ६ जानेवारी, २००४. दुबईच्या वालुकामय भूभागावर खोदकाम सुरू झाले, एका अशा स्वप्नाच्या पायाभरणीसाठी, ज्याने केवळ एका शहराचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे भविष्य बदलले. जगातील सर्वात उंच इमारत बांधण्याचे हे स्वप्न होते. २००४ च्या अखेरीस, जगातील सर्वात उंच इमारत होती ताइपेई १०१. तैवानमधील ही गगनचुंबी इमारत ५०९ मीटरपेक्षा थोडी जास्त उंच होती. पण दुबईतील नेतृत्वाने जे ध्येय ठेवले होते, ते अकल्पनीय आणि विक्रमी होते. त्यांना अशी इमारत हवी होती जी केवळ जगातील सर्वात उंच इमारतच नव्हे, तर दुसऱ्या क्रमांकाच्या इमारतीपेक्षा तब्बल ६२% अधिक उंच असेल. सर्वात उंच आणि दुसऱ्या क्रमांकाच्या इमारतीमधील हा प्रचंड फरक कोणालाही त्याचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न करण्यापासून परावृत्त करेल. बुर्ज खलिफापूर्वी, जगातील मागील सर्वात उंच इमारती त्यांच्या आधीच्या इमारतींपेक्षा साधारण ५% ते १९% पर्यंतच उंच होत्या. पण दुबईने थेट ८२९ मीटर उंच इमारत बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले—म्हणजे ६२% चा फरक! या इमारतीच्या बांधकामाला साधारण ५.५ वर्षे लागली आणि १ ऑक्टोबर २००९...

भाग -2 चार्ल्स शोभराज

 


भाग -2

चार्ल्स शोभराज 

चार्ल्सने शेनलसाठी एक भव्य कॅसिनो पार्टीचं नियोजन केलं. त्याने एक चोरीची कार घेतली आणि शेनलला पार्टीच्या ठिकाणी नेलं. त्या जागेची भव्यता अशी होती की जणू एखाद्या सिनेमाचा सेट आहे. याच ठिकाणी त्याने शेनलला लग्नासाठी प्रपोज केलं. सर्वकाही रोमँटिक क्षणांसारखं वाटत होतं. पण नशिबाने त्याला धक्का देण्यास उशीर केला नाही. कॅसिनोतून परतताना पोलिसांनी कार थांबवली आणि चोरीच्या गाडी चालवल्याच्या गुन्ह्यासाठी चार्ल्सला अटक केली. यावेळी त्याला 8 महिने तुरुंगात घालवावे लागले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही शेनलने त्याला सोडलं नाही. दोघांनी लग्न केलं, पण हे लग्न चार्ल्सच्या आयुष्याला नवी सुरुवात देऊ शकलं नाही. उलट, त्याच्या गुन्हेगारीचा विस्तार आणखी वाढत गेला.

1970 मध्ये, चार्ल्सने आपला जुना मित्र फेलिक्सला सांगितलं, "थोडं फिरायला जायचंय, कार हवी." आणि मग आपल्या पत्नीसह काही पैसे गोळा करून तो फ्रान्समधून निघाला. पूर्व युरोपमार्गे तो आशियाकडे निघाला. या प्रवासादरम्यानही तो थांबला नाही. वाटेत नवे लोक भेटले, मैत्री झाली, विश्वास निर्माण झाला, आणि एक-एक करून त्याने सर्वांना लुटलं. अखेरीस त्याचा प्रवास भारतातील मुंबई शहरात येऊन थांबला. येथे शेनलने एका मुलीला जन्म दिला. पिता बनण्याचा चार्ल्सवर काहीच परिणाम झाला नाही. त्याच्या मनात माणुसकी जागी झाली नाही. त्याने फार कमी वेळात मुंबईत कार चोरी आणि तस्करीचं एक संघटित रॅकेट उभं केलं. तो पाकिस्तान आणि इराणमधून महागड्या गाड्या चोरायचा आणि सीमेवर तैनात काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना मोठी लाच देऊन त्या भारतात आणायचा. या गाड्या त्या श्रीमंत भारतीयांना विकल्या जायच्या, जे परदेशी गाड्यांचे शौकीन होते.

याच दरम्यान त्याची भेट एका फ्रेंच माणसाशी झाली, ज्याने त्याला दिल्लीतील अशोक हॉटेलच्या ज्वेलरी शोरूम लुटण्याची मोठी योजना सांगितली. योजनेनुसार, हॉटेलच्या दुकानाच्या वरच्या खोलीत राहून मजल्यात छिद्र करायचं आणि रात्रीच्या वेळी खालील दुकानात घुसून मौल्यवान दागिने चोरायचे. ऑक्टोबर 1971 मध्ये चार्ल्स दिल्लीत पोहोचला आणि थेट अशोक हॉटेलमध्ये ती खोली बुक करण्याचा प्रयत्न केला, जी दुकानाच्या बरोबर वरती होती. पण ती खोली आधीच एका स्पॅनिश नर्तकी, ग्लोरिया मेंडलिकच्या नावाने बुक होती, जी त्या संध्याकाळी हॉटेलमध्ये परफॉर्म करणार होती.

चार्ल्सने हार मानली नाही. त्याने ग्लोरियाशी भेट घेतली आणि स्वतःला आंतरराष्ट्रीय हॉटेल चेनचा मालक सांगून तिला प्रभावित केलं. काही तासांतच त्याने ग्लोरियाला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि तिलाही लग्नासाठी प्रपोज केलं. ग्लोरिया, जी त्याच्या बोलण्याने पूर्णपणे प्रभावित झाली होती, त्याला आपल्या खोलीत घेऊन आली. संध्याकाळी जेव्हा ग्लोरिया आपल्या डान्स शोसाठी हॉटेलच्या नाइटक्लबमध्ये गेली, तेव्हा चार्ल्सने आपलं खरं काम सुरू केलं. त्याने तात्काळ ड्रिल मशीन काढली आणि मजल्यात छिद्र करण्याचा प्रयत्न केला. पण नशिबाने पुन्हा धोका दिला. मशीन मध्येच तुटली. चार्ल्सला धक्का बसला. आता काय? सगळं संपलं का? एका क्षणासाठी त्याला वाटलं की त्याचा मास्टर प्लॅन उद्ध्वस्त होईल. पण चार्ल्स शोभराजकडे नेहमीच एक पर्यायी योजना असायची.

चार्ल्स शोभराज सामान्य चोर नव्हता. त्याला परिस्थिती आपल्या बाजूने वळवता यायची. जेव्हा पहिली योजना अयशस्वी झाली आणि ड्रिल मशीन तुटली, तेव्हा त्याने घाबरून न जाता प्लॅन बीवर काम सुरू केलं. ग्लोरिया परत येताच त्याने तिला सांगितलं, "कृपया ज्वेलरी स्टोअरच्या मालकाला फोन कर. मला काही खास दागिन्यांमध्ये रस आहे." फोनवर चार्ल्सने मोठ्या आत्मविश्वासाने स्वतःला नेपाळचा राजकुमार सांगितलं आणि म्हणाला की त्याला दागिन्यांचं दुकानात नव्हे, तर ग्लोरियाच्या खोलीतच दागिने पाहायचे आहेत. ज्वेलरला काही शंका आली नाही. त्याने आपल्या विश्वासू माणसाला सर्वात महागडे हिरे आणि रत्नं घेऊन ग्लोरियाच्या खोलीत पाठवलं.

जेव्हा तो माणूस खोलीत पोहोचला, तेव्हा चार्ल्सने काही क्षणात संपूर्ण चित्र बदललं. त्याने तात्काळ त्याच्यावर आणि ग्लोरियावर बंदूक ताणली. मग एक खास नशील्या पदार्थाचा वास देऊन दोघांना बेशुद्ध केलं. काही वेळाने जेव्हा ज्वेलरला वाटलं की त्याचा माणूस अद्याप का परतला नाही, तेव्हा तो स्वतः ग्लोरियाच्या खोलीकडे गेला. चार्ल्सने दरवाजा उघडला आणि हसत म्हणाला, "आत या, प्रिन्स साहेब तुमची वाट पाहत आहेत." ज्वेलर आत येताच तेच नाटक पुन्हा घडलं - बंदूक, नशीलं पदार्थ, आणि बेशुद्धी. आता खोलीत तिघेही बेशुद्ध पडले होते. चार्ल्सने निवांतपणे त्यांना दोरीने बांधलं, ज्वेलरच्या खिशातून दुकानाच्या चाव्या काढल्या, खाली दुकानात जाऊन 15 लाखांचे हिरे आणि मौल्यवान रत्नं गोळा केली. आपली बॅग भरली आणि हॉटेलमधून निघून गेला.

पण एक चूक झाली. घाईत त्याचा पासपोर्ट खोलीतच राहिला, ज्यावर त्याचं खरं नाव लिहिलेलं होतं. तीन तासांनंतर जेव्हा त्या तिघांना शुद्ध आली, तेव्हा त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं. हा हायप्रोफाइल प्रकरण होतं आणि जागा होती देशाच्या राजधानीतील सर्वात सुरक्षित हॉटेल - अशोक. संपूर्ण पोलिस खातं हादरलं. काही अधिकारी हॉटेलच्या आजूबाजूला तपासात गुंतले, तर काही थेट विमानतळाकडे धावले. त्यांच्याकडे पासपोर्ट होता, आणि त्यांना खात्री होती की चार्ल्स देश सोडण्याच्या तयारीत असेल. आणि तसंच झालं. चार्ल्स शोभराज एअर फ्रान्सच्या पॅरिसला जाणाऱ्या फ्लाइटसाठी कस्टम काउंटरवर उभा होता. पण तेवढ्यात त्याची नजर ज्वेलरच्या माणसावर पडली, जो पोलिसांसोबत विमानतळावर हजर होता. चार्ल्सने तात्काळ परिस्थिती ओळखली आणि कोणतीही हालचाल न करता गर्दीत गायब झाला.

पण नशीब नेहमी साथ देत नाही. दोन आठवड्यांनंतर मुंबईच्या ताजमहाल हॉटेलमध्ये त्याने एका परदेशी पर्यटकाला लुटण्याचा प्रयत्न केला, आणि यावेळी तो पकडला गेला. मुंबई पोलिसांनी त्याला घटनास्थळीच अटक केली. त्याच्याकडून बेकायदा रिव्हॉल्व्हरही जप्त केलं. तपासात जेव्हा कड्या जोडल्या गेल्या, तेव्हा समोर आलं की हाच तो माणूस आहे, ज्याने दिल्लीच्या अशोक हॉटेलमधून लाखोंच्या दागिन्यांची चोरी केली होती. चार्ल्सला ट्रायलसाठी दिल्लीला पाठवण्यात आलं आणि तिहाड तुरुंगात टाकण्यात आलं.

आता तुरुंग त्याच्यासाठी नवीन अनुभव नव्हता. त्याने काही दिवस तिथलं वातावरण समजून घेतलं आणि मग पलायनाची योजना आखली. एके दिवशी त्याने तुरुंग अधिकाऱ्यांना सांगितलं, "मला खूप वेदना होत आहेत. कदाचित अपेंडिक्स आहे. जर लवकर उपचार झाले नाहीत, तर माझा जीवही जाऊ शकतो." तुरुंग प्रशासन त्याच्या बोलण्यात आलं. जास्त तपास न करता त्याला दिल्लीच्या वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. आणि हाच तो क्षण होता. चार्ल्सने यावेळी आपली पत्नी शेनललाही या खेळात सामील केलं. ती हॉस्पिटलमध्ये चार्ल्सच्या बेडखाली लपली होती, आणि जेव्हा पोलिसांनी ती दिसली, तेव्हा तिने दोघांच्या चेहऱ्यावर गुंगी येणारं औषध टाकून बेशुद्ध केलं. चार्ल्सने एक क्षणही वाया घालवला नाही. आणि तो हॉस्पिटलमधून निघून गायब झाला. आणि पुन्हा एकदा संपूर्ण पोलिस खातं चार्ल्स शोभराजच्या मागे धावू लागलं.

पण नशिबाची दोरी जास्त काळ खेचता येत नाही. तिहार मधून पलायन केल्यानंतर काही तासांतच त्याला जुनी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून पकडलं गेलं. त्याची पत्नी शेनललाही हॉस्पिटलमधून अटक करण्यात आली आणि दोघांना पुन्हा तुरुंगात टाकण्यात आलं. त्या वेळी त्याचे गुन्हे इतके गंभीर मानले गेले नव्हते, त्यामुळे काही दिवसांनंतर दोघांना जामीन मिळाला. पण चार्ल्ससारख्या शातिर माणसासाठी जामीन म्हणजे एकच गोष्ट - देश सोडण्याची संधी. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने आपली पत्नी आणि मुलीला घेऊन भारत सोडला. यावेळी त्याने अफगाणिस्तानची राजधानी काबूलला आपलं नवं ठिकाण बनवलं.

तिथे पोहोचताच त्याने आपला जुना धंदा सुरू केला - फसवणूक आणि ठगी. त्याचा नवा टारगेट होता हिप्पी पर्यटक, जे युरोपमधून हशीश, गांजा आणि अध्यात्माच्या शोधात अफगाणिस्तानला यायचे. चार्ल्स त्यांना महागड्या ड्रग्ज विकायचा, आसपासच्या परिसरात फिरवायचा, आणि मग संधी मिळताच नशीलं पदार्थ च्या साह्याने बेशुद्ध करायचा. जेव्हा त्यांना शुद्ध यायची, तेव्हा त्यांचं सामान, पासपोर्ट, पैसे आणि विश्वास सगळं गायब झालेलं असायचं.

1975 मध्ये चार्ल्सने पुन्हा भारतात येण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याच्या आयुष्यात दोन नवे लोक आले - मेरी लेके, एक कॅनेडियन महिला, जिच्याशी त्याचे प्रेमसंबंध होते, आणि अजय चौधरी, एक भारतीय तरुण, जो त्याचा सर्वात विश्वासू साथीदार बनला. या तिघांनी मिळून एक तगडी टोळी बनवली आणि गुन्हेगारीचा नवा अध्याय सुरू झाला. त्या काळात पाश्चिमात्य देशांमध्ये हिप्पी संस्कृतीचा बोलबाला होता. युरोप आणि अमेरिकेतील लोक जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी किंवा जग फिरण्यासाठी स्वस्त आशियाई देशांमध्ये यायचे. थायलंड त्या काळात एक आदर्श ठिकाण होतं - कमी सुरक्षा, जास्त मोकळीक, आणि पोलिसांना लाच देणं सोपं. चार्ल्सला वाटलं की यापेक्षा चांगलं ठिकाण असूच शकत नाही.

तो आपली कॅनेडियन प्रेमिका मेरी आणि अजयसह थायलंडला पोहोचला आणि लवकरच तिथे एकापाठोपाठ एक हिप्पी पर्यटकांना शिकार बनवायला सुरुवात केली. तो आधी त्यांच्याशी मैत्री करायचा, मग हळूहळू त्यांना विश्वासात घेयचा, त्यांच्या खाण्यापिण्यात नशीलं पदार्थ मिसळायचा, आणि जेव्हा ते बेशुद्ध व्हायचे, तेव्हा त्यांचं सगळं लुटायचा. जर कोणी जरा जास्त शंका घ्यायचा किंवा जास्त बोलायचा, तर तो बिना संकोच त्याला ठार मारायचा. काहींना पाण्यात बुडवून, काहींचा गळा दाबून, काहींना चाकूने, तर काहींना जिवंत जाळण्यापर्यंत त्याने काहीच कसर सोडली नाही. त्याचा अंदाज इतका परिपूर्ण आणि गुन्ह्याची रचना इतकी अचूक होती की प्रत्येक घटना एखाद्या कथेसारखी वाटायची. आणि याच भयानक, धोकादायक कहाणीचं नाव होतं चार्ल्स शोभराज.

भाग -3 उद्या सकाळी 10 वाजता 


टिप्पण्या