मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

गगनाला गवसणी

  बुर्ज खलिफाचा अद्वितीय विक्रम आणि मानवी महत्त्वाकांक्षेच्या मर्यादा ६ जानेवारी, २००४. दुबईच्या वालुकामय भूभागावर खोदकाम सुरू झाले, एका अशा स्वप्नाच्या पायाभरणीसाठी, ज्याने केवळ एका शहराचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे भविष्य बदलले. जगातील सर्वात उंच इमारत बांधण्याचे हे स्वप्न होते. २००४ च्या अखेरीस, जगातील सर्वात उंच इमारत होती ताइपेई १०१. तैवानमधील ही गगनचुंबी इमारत ५०९ मीटरपेक्षा थोडी जास्त उंच होती. पण दुबईतील नेतृत्वाने जे ध्येय ठेवले होते, ते अकल्पनीय आणि विक्रमी होते. त्यांना अशी इमारत हवी होती जी केवळ जगातील सर्वात उंच इमारतच नव्हे, तर दुसऱ्या क्रमांकाच्या इमारतीपेक्षा तब्बल ६२% अधिक उंच असेल. सर्वात उंच आणि दुसऱ्या क्रमांकाच्या इमारतीमधील हा प्रचंड फरक कोणालाही त्याचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न करण्यापासून परावृत्त करेल. बुर्ज खलिफापूर्वी, जगातील मागील सर्वात उंच इमारती त्यांच्या आधीच्या इमारतींपेक्षा साधारण ५% ते १९% पर्यंतच उंच होत्या. पण दुबईने थेट ८२९ मीटर उंच इमारत बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले—म्हणजे ६२% चा फरक! या इमारतीच्या बांधकामाला साधारण ५.५ वर्षे लागली आणि १ ऑक्टोबर २००९...

इब्राहिम त्रावरे : आफ्रिकेच्या क्रांतीचा नवा चेहरा

इब्राहिम त्रावरे : आफ्रिकेच्या क्रांतीचा नवा चेहरा
इब्राहिम त्रावरे 

इब्राहिम त्रावरे : आफ्रिकेच्या क्रांतीचा नवा चेहरा  

आफ्रिका खंडाचा इतिहास लुटमारी, गुलामगिरी आणि शोषणाने काळवंडलेला आहे. परंतु, हीच भूमी थॉमस संकारा आणि आता इब्राहिम त्रावरे यांसारख्या धाडसी नेत्यांना जन्म देते. ३६ वर्षीय इब्राहिम त्रावरे हे आज जगभरात चर्चेचा विषय आहेत. बुरकिना फासो या पश्चिम आफ्रिकन देशात झालेल्या सत्ताबदलानंतर त्यांनी स्वतःला एक "जनतेचा नेता" म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.  

बुरकिना फासो : आत्मनिर्भरतेची कहाणी  

“ईमानदार लोकांची भूमी” असा अर्थ असलेल्या बुरकिना फासोचा इतिहास फारच अस्थिर आहे. फ्रेंच वसाहतवाद, वारंवार होणारी लष्करी बंडखोरी, आर्थिक कोंडी आणि दहशतवाद – या सगळ्यामुळे येथील सामान्य जनता त्रस्त झाली आहे. १९८० च्या दशकात थॉमस संकारा यांनी हाच देश नव्या जोमाने उभा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भ्रष्टाचार, भूक आणि परावलंबित्वाविरुद्ध क्रांती उभारली. महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य यावर भर देत त्यांनी “आफ्रिकेचा ब्लॅक चे ग्वेरा” म्हणून जागतिक ओळख मिळवली. पण १९८७ मध्ये त्यांच्या हत्येनंतर बुरकिना फासो पुन्हा जुन्याच राजकीय जाळ्यात अडकला.  

इब्राहिम त्रावरे : नवा वारस  

१९८८ मध्ये जन्मलेले त्रावरे, सैन्यातूनच पुढे आले. २०२२ मध्ये लष्करी बंड करून त्यांनी सत्ता हस्तगत केली. सुरुवातीला लोकांना शंका होती की हा आणखी एक हुकूमशहा जन्माला आला आहे का? परंतु, त्यांच्या धोरणांमध्ये लोकांनी संकारांचा परछाया पाहिला. त्यांनी फ्रान्सशी असलेला जुना प्रभावी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला. फ्रेंच सैन्य आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना देशाबाहेर हाकललं, तसेच स्थानिक संपत्तीवर म्हणजेच सोनेखाणींवर बुरकिनावासींचं नियंत्रण वाढवलं.  

राष्ट्राध्यक्षांचा पगार स्वीकारण्यास नकार देऊन, लोकांमध्ये संदेश दिला की ते सत्तेचा उपभोग घेण्यासाठी नाही तर देश उभा करण्यासाठी आले आहेत. तरुणांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला आणि त्यामुळे अल्पावधीतच ते तरुण पिढीचे हिरो बनले.  

आफ्रिकेच्या ओढाताणीमध्ये  

आफ्रिका खंडातील देश अजूनही जागतिक राजकारणाच्या वावटळीत आहेत. फ्रान्ससारख्या जुना वसाहतवादी देशाचा प्रभाव कमी होत असताना रशिया आणि चीनसारखे नवे खेळाडू पुढे येत आहेत. त्रावरे यांचे धोरण म्हणजे फ्रान्सला दार दाखवून रशिया-चीनकडे झुकणं. लोकांमध्ये यामुळे आत्मसन्मान वाढला असला तरी प्रश्न आहे – ही खरी स्वातंत्र्याची दिशा आहे की नव्या प्रकारचा "नव-उपनिवेशवाद"? 

इब्राहिम त्रावरे : आफ्रिकेच्या क्रांतीचा नवा चेहरा
इब्राहिम त्रावरे 

आव्हाने कायम 

त्रावरे यांच्या नेतृत्वासमोर प्रचंड आव्हाने आहेत. इस्लामी दहशतवादा विरोधात सतत संघर्ष सुरू आहे. अर्थव्यवस्था अजूनही काठावर आहे. शिवाय त्यांच्यावर प्रेस स्वातंत्र्य दडपल्याचे, विरोधी पक्षांना आवाज दाबल्याचे आरोप आहेत. त्यांनी निवडणुका पुढे ढकलून २०२९ पर्यंत स्वतःची सत्ता कायम ठेवली आहे. लोकशाहीची गाडी रुळावरून घसरू नये, याची चिंता अनेकांना वाटते.  

इतिहासात आपण वारंवार पाहिलं आहे – बंडातून सत्ता मिळवणारे नेते एका टप्प्यानंतर तानाशहा बनतात. त्रावरे यांच्या बाबतीतही तसंच होणार का? की ते खरोखरीच आफ्रिकेसाठी नवा मार्ग दाखवणारे नेते ठरतील? हा प्रश्न आज संपूर्ण जग विचारत आहे.  

क्रांती की तानाशाही?  

त्रावरे यांनी राष्ट्रवादाची जाज्वल्य भावना जागवली आहे. लोकांच्या डोळ्यात त्यांनी आशेची ठिणगी पेटवली आहे. पण खरा क्रांतिकारी तेव्हाच म्हटला जातो जेव्हा तो जनतेसाठी पारदर्शक, जबाबदार आणि दीर्घकालीन न्यायव्यवस्था निर्माण करतो. जर ते फक्त बंडखोरी आणि परकीय सत्तेविरुद्धचा राग यापुरते मर्यादित राहतील, तर त्यांची कहाणीही कदाचित संकारांसारखी अपूर्ण ठरेल. पण जर त्यांनी अंधश्रद्धा, भ्रष्टाचार आणि असमानतेविरुद्ध खऱ्या अर्थाने पाऊल उचललं, तर ते आफ्रिकेच्या नव्या पुनर्जागरणाचे प्रतीक ठरू शकतात.

इब्राहिम त्रावरे हे आजच्या आफ्रिकेत सर्वाधिक चर्चिले जाणारे नाव आहे. एका बाजूला ते जनतेला आवडणारे तरुण नेता आहेत, तर दुसरीकडे त्यांना हुकूमशाहीचा धोका आहे. ते खरे क्रांतिकारी ठरतील की पुढचा तानाशहा?हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पण एक गोष्ट नक्की – आफ्रिकेची जनता आता शांत बसण्यास तयार नाही. लोकांच्या मनात पुन्हा एकदा आत्मनिर्भरतेची ज्योत पेटली आहे, आणि या ज्वालेच्या केंद्रस्थानी त्रावरे उभे आहेत. 

माहिती आवडली असल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद. 



टिप्पण्या