मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

गगनाला गवसणी

  बुर्ज खलिफाचा अद्वितीय विक्रम आणि मानवी महत्त्वाकांक्षेच्या मर्यादा ६ जानेवारी, २००४. दुबईच्या वालुकामय भूभागावर खोदकाम सुरू झाले, एका अशा स्वप्नाच्या पायाभरणीसाठी, ज्याने केवळ एका शहराचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे भविष्य बदलले. जगातील सर्वात उंच इमारत बांधण्याचे हे स्वप्न होते. २००४ च्या अखेरीस, जगातील सर्वात उंच इमारत होती ताइपेई १०१. तैवानमधील ही गगनचुंबी इमारत ५०९ मीटरपेक्षा थोडी जास्त उंच होती. पण दुबईतील नेतृत्वाने जे ध्येय ठेवले होते, ते अकल्पनीय आणि विक्रमी होते. त्यांना अशी इमारत हवी होती जी केवळ जगातील सर्वात उंच इमारतच नव्हे, तर दुसऱ्या क्रमांकाच्या इमारतीपेक्षा तब्बल ६२% अधिक उंच असेल. सर्वात उंच आणि दुसऱ्या क्रमांकाच्या इमारतीमधील हा प्रचंड फरक कोणालाही त्याचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न करण्यापासून परावृत्त करेल. बुर्ज खलिफापूर्वी, जगातील मागील सर्वात उंच इमारती त्यांच्या आधीच्या इमारतींपेक्षा साधारण ५% ते १९% पर्यंतच उंच होत्या. पण दुबईने थेट ८२९ मीटर उंच इमारत बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले—म्हणजे ६२% चा फरक! या इमारतीच्या बांधकामाला साधारण ५.५ वर्षे लागली आणि १ ऑक्टोबर २००९...

सम्राट हिरोहितो: वादग्रस्त वारसा आणि जपानचा पुनर्जन्म

सम्राट हिरोहितो

सम्राट हिरोहितो: वादग्रस्त वारसा आणि जपानचा पुनर्जन्म

"माझे हृदय आजही दुसऱ्या महायुद्धात मरण पावलेल्या लोकांसाठी दुखावते." हे उद्गार होते सम्राट हिरोहितो यांचे, जपानचे सर्वात दीर्घकाळ सेवा देणारे सम्राट आणि जगाच्या इतिहासातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. त्यांचे नाव ऐकल्यावर आजही अनेकांना हिटलर किंवा मुसोलिनी यांसारख्या हुकूमशहांची आठवण येते. युद्धगुन्हेगार, शक्तीहीन शासक किंवा चुकीचे निर्णय घेणारा नेता म्हणून त्यांच्यावर अनेकदा टीकेची झड उठली. पर्ल हार्बरवरील हल्ला असो किंवा दुसऱ्या महायुद्धात जपानची शरणागती, हे सर्व महत्त्वपूर्ण निर्णय त्यांच्याच कारकिर्दीत झाले, ज्यांचा जपानच्या इतिहासावर आणि भविष्यावर खोल परिणाम झाला. तरीही, अनेक हत्यांचे प्रयत्न, स्वतःच्या सैन्याचा विरोध आणि प्रचंड पराभवानंतरही हिरोहितो यांनी जपानला सावरले आणि एका विकसित राष्ट्रात रूपांतरित केले. पण हे कसे घडले? हजारो आरोपांनंतरही ते जपानच्या गादीवर एवढा काळ कसे टिकले? आणि मित्रराष्ट्रांनी त्यांना युद्धगुन्हेगार का मानले नाही? चला, त्यांच्या वादग्रस्त पण तितक्याच महत्त्वाच्या आयुष्याचा वेध घेऊया.

एका राजपुत्राचा जन्म आणि योद्ध्याची जडणघडण

२९ एप्रिल १९०१ रोजी टोकियो येथे क्राउन प्रिन्स योशीहितो आणि क्राउन प्रिन्सेस सादाको यांच्या पोटी हिरोहितो यांचा जन्म झाला. ते त्यांच्या पालकांचे पहिले अपत्य असल्याने जपानच्या सम्राटपदाची जबाबदारी त्यांच्यावरच येणार होती. जन्माच्या वेळी त्यांचे आजोबा, सम्राट मेजी, राज्य करत होते. राजघराण्यात जन्माला आल्याने त्यांना लहानपणापासूनच एक योद्धा आणि सम्राट बनण्याचे प्रशिक्षण मिळाले. विशेष म्हणजे, जन्मानंतर अवघ्या १० आठवड्यांनी त्यांना राजवाड्यातून निवृत्त व्हाइस अॅडमिरल कावामुरा सुमियोशी यांच्या घरी पाठवण्यात आले, जिथे त्यांचा नातवाप्रमाणे सांभाळ झाला. तीन वर्षांचे झाल्यावर सुमियोशी यांच्या निधनानंतर ते पुन्हा राजवाड्यात परतले.

सात वर्षांचे झाल्यावर हिरोहितो यांनी राजघराण्यातील मुलांना शिकवणाऱ्या विशेष शाळेत प्रवेश घेतला. येथे त्यांना गणित, भौतिकशास्त्र, लष्करी धोरणे, धार्मिक बाबी यांसोबतच काटकसर, संयम, पुरुषार्थ, आत्मसंयम आणि भक्ती यांसारख्या मूल्यांचे धडे देण्यात आले. वयाच्या ११ व्या वर्षीच त्यांना इम्पीरियल जपानी सैन्यात सेकंड लेफ्टनंट आणि इम्पीरियल जपानी नौदलात एनसाइन म्हणून नियुक्त करण्यात आले, जे त्यांच्या भावी भूमिकेची तयारी होती.

वैयक्तिक आवडी आणि परंपरा मोडणारा परदेश दौरा

सम्राटपदाचे शिक्षण घेत असताना हिरोहितो यांना मरीन बायोलॉजीमध्ये विशेष रुची होती. त्यांनी या विषयावर अनेक पुस्तकेही लिहिली, जी त्यांची अभ्यासू वृत्ती दर्शवते. त्यांच्या आयुष्यातील अनेक निर्णयांपैकी एक महत्त्वाचा निर्णय होता परदेश दौरा. हिरोहितो हे जपानचे पहिले क्राउन प्रिन्स होते ज्यांनी परदेशात न जाण्याची जुनी परंपरा मोडली. त्यांनी युनायटेड किंगडम, फ्रान्स, नेदरलँड्स, बेल्जियम, इटली आणि व्हॅटिकन सिटीला भेट दिली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ब्रिटनचे किंग जॉर्ज पाचवे, पंतप्रधान डेव्हिड लॉयड जॉर्ज आणि इटलीचे किंग व्हिक्टोरियो इमॅन्युएल तिसरा यांसारख्या जागतिक नेत्यांशी संवाद साधला. या दौऱ्याने त्यांना जगाचे एक विस्तृत दृष्टिकोन दिला, जो त्यांच्या भावी शासनासाठी महत्त्वाचा ठरला असावा.

सम्राटपद आणि 'शोवा' युगाची वादळी सुरुवात

परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर हिरोहितो यांच्या आयुष्यात मोठे बदल झाले. त्यांना क्राउन प्रिन्सऐवजी प्रिन्स रीजेंटचे पद देण्यात आले, कारण त्यांचे वडील योशीहितो मानसिक आजारामुळे राज्यकारभारासाठी अक्षम झाले होते. लहानपणापासून मिळालेल्या प्रशिक्षणामुळे त्यांना अचानक सत्ता हाती घेण्यात फारशी अडचण आली नाही. पण याच काळात त्यांच्यावर हत्येचा प्रयत्नही झाला. डायसुके नांबा नावाच्या एका व्यक्तीने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला आणि त्याला फाशी देण्यात आली.

या घटनेनंतर काही दिवसांनी, २६ जानेवारी १९२४ रोजी हिरोहितो यांनी त्यांच्या दूरच्या नातेवाईक प्रिन्सेस नागाको कुनी यांच्याशी विवाह केला. डिसेंबर १९२६ मध्ये वडील योशीहितो यांच्या निधनानंतर हिरोहितो यांना अधिकृतपणे सम्राट घोषित करण्यात आले. यासोबतच तायशो युगाचा (महान न्याय) अंत झाला आणि शोवा युगाची (प्रबुद्ध शांती) सुरुवात झाली. मात्र, शोवा युगाला हे नाव मिळाले असले तरी त्यांच्या काळात जपानला शांती फारच कमी मिळाली. दुसरे महायुद्ध, चीन-जपान युद्ध, आणि अण्वस्त्र हल्ल्याचा विनाश - हे सर्व जपानने हिरोहितो यांच्या कारकिर्दीतच अनुभवले.

दुसऱ्या महायुद्धाचे वादळ आणि हिरोहितो यांची भूमिका

सम्राट हिरोहितो
पर्ल हार्बर वरील हल्ला
हिरोहितो यांच्या सम्राटपदाच्या काळात त्यांची भूमिका जगभरात चर्चेचा विषय ठरली. चीनवरील आक्रमण, पर्ल हार्बरवरील बॉम्बहल्ला आणि मित्रराष्ट्रांना शरणागती यांसारख्या मोठ्या आणि विनाशकारी निर्णयांबद्दल त्यांची जगभरात निंदा झाली. यामुळे जपानला दुसऱ्या महायुद्धात पराभवाला सामोरे जावे लागले आणि अण्वस्त्र हल्ल्याचा भयानक अनुभवही घ्यावा लागला.

काही इतिहासकारांचे मत आहे की हिरोहितो हे शक्तीहीन सम्राट होते, कारण त्यांच्या देशाची सत्ता त्यांच्या हातून सैन्य आणि नौदलाच्या हातात गेली होती. १९०० पासूनच जपानमध्ये मंत्रिमंडळाच्या निर्मितीवर इम्पीरियल जपानी सैन्य आणि नौदलाला 'नकाराधिकार' (Veto Power) होता. हिरोहितो यांच्या सम्राटपदासोबतच सर्वसामान्य पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला, ज्यामुळे राजकीय पक्षही त्यांच्या युद्धपूर्व शक्तीच्या शिखरावर होते. या बदलांमुळे सम्राटांचा प्रभाव कमी होऊन सैन्याचा वाढला. १९२१ ते १९४४ या काळात ६४ राजकीय हिंसक घटना घडल्या, ज्यात १९३२ मध्ये पंतप्रधान इनुकाई सियोशी यांच्या हत्येचाही समावेश होता.

पण एका प्रसिद्ध विद्वानाने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, जेव्हा हिरोहितो यांच्या सैन्यप्रमुखाने पर्ल हार्बरवर हल्ल्याची कल्पना मांडली, तेव्हा हिरोहितो यांच्या चेहऱ्यावर कसलीही चिंता नव्हती. त्यांनी पूर्ण शांतपणे आणि ठामपणे हल्ल्याला मंजुरी दिली. त्यानंतर जपानच्या नौदलाने ७ डिसेंबर १९४१ रोजी पर्ल हार्बरवर भयानक हल्ला केला, ज्यात २४०३ अमेरिकन सैनिक आणि ६८ नागरिकांसह २४०० हून अधिक लोक मरण पावले. या हल्ल्यात १९ अमेरिकन नौदलाची जहाजे आणि आठ युद्धनौका पूर्णपणे नष्ट झाल्या किंवा खराब झाल्या.

पर्ल हार्बर हल्ल्यामुळे अमेरिका क्रोधीत झाली. या हल्ल्यापूर्वी अमेरिका दुसऱ्या महायुद्धात थेट सहभागी नव्हती, पण या हल्ल्याने अमेरिकेने जपानला उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली. परिणामी, अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अण्वस्त्र हल्ले केले, ज्यामुळे जपानला प्रचंड नुकसान झाले. आजही अनेकांचे मत आहे की, जर जपानने अमेरिकेच्या बंदरावर हल्ला केला नसता, तर कदाचित युद्धाचा निकाल आणि जपानचे भविष्य काही वेगळेच असते.

सम्राट हिरोहितो
अमेरिकाचा जपानवरील अणुबॉम्बचा हल्ला 
युद्धगुन्ह्यांचे आरोप आणि संरक्षणाचे कारण

हिरोहितो यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक वादग्रस्त निर्णय घेतले असले, तरी दुसऱ्या महायुद्धानंतर जपानच्या पंतप्रधानांपासून ते अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना युद्धगुन्हेगार म्हणून घोषित करून त्यांच्यावर खटले चालवण्यात आले. मात्र, हिरोहितो यांना मित्रराष्ट्रांच्या अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी युद्धगुन्ह्यांचा हिस्सेदार बनण्यापासून वाचवले. यामागे एक महत्त्वाचे कारण होते – जपानच्या भविष्याची सुरक्षितता. मित्रराष्ट्रांचा असा विश्वास होता की, जर हिरोहितो यांना वाचवले गेले, तर त्यांना जपानमध्ये पुढे आपले सरकार स्थापन करण्यास आणि चालवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. युद्धानंतर अस्थिरता टाळण्यासाठी हा एक महत्त्वाचा राजकीय निर्णय होता.

अंतर्गत बंडखोरी आणि हत्येचे प्रयत्न

सम्राट म्हणून हिरोहितो यांना अनेक अंतर्गत आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यांच्यावर अनेकदा हत्येचे प्रयत्न झाले. एकदा कोरियन स्वातंत्र्य कार्यकर्ता ली बोंग-चांग याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण हिरोहितो बचावले. जपानच्या सैन्यानेही अनेकदा बंड करण्याचा प्रयत्न केला. एका बंडाचा कट कनिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांनी रचला होता, ज्यात अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि हिरोहितो यांचा भाऊ यासुहितो यांचाही समावेश होता. याचे मुख्य कारण होते डाइट निवडणुकीत सैन्याला राजकीय पाठिंब्याचा अभाव.

जेव्हा सैन्यप्रमुख शिगेरू होंजो यांनी हिरोहितो यांना बंडाची कारणे समजावून सांगितली, तेव्हा हिरोहितो यांनी तात्काळ बंड करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना बंडखोर घोषित करून बंड शांत करण्याचे आदेश दिले. सैन्य मंत्री योशीयुकी कावाशिमा यांनी सम्राटाविरुद्ध होणारे सर्व बंड दडपून टाकले. हिरोहितो यांना आणखी एक अडचण होती की, देशात येणारे सर्व पंतप्रधान राजकीय पक्षांमधून न येता सैन्यातून येत होते, ज्यामुळे बंडाची शक्यता नेहमीच कायम राहत होती.

चीन-जपान युद्ध आणि नानकिंग बलात्कार

या सर्व घटनांदरम्यान जपान आणि चीन यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत गेला. जपानने मंचुरियावर हल्ला करून ते आपल्या ताब्यात घेण्याचा पूर्ण आराखडा तयार केला होता. पण यासाठी त्यांना एका कारणाची गरज होती, कारण कोणत्याही कारणाशिवाय चीनवर सैन्य पाठवले असते तर जगभरात जपानची निंदा झाली असती. म्हणून १९३१ मध्ये जपानी सैन्य अधिकाऱ्यांनी तथाकथित मंचुरियन घटनेचा खेळ रचला. त्यांनी स्वतःच्या रेल्वेवर स्फोट घडवून आणला आणि त्याचा दोष चीनवर टाकला. या स्फोटाच्या निमित्ताने जपानी सैन्याने चीनच्या ईशान्य भागात प्रवेश केला आणि मंचुरियावर ताबा मिळवला.

या युद्धात जपानी सैनिकांनी २० ते ३० दशलक्ष चिनी नागरिकांना ठार केले, ज्यात २३ दशलक्ष स्थानिक चिनी लोकांचा समावेश होता. या भयंकर घटनेला नानकिंग बलात्कार (Rape of Nanking) म्हणूनही ओळखले जाते, जी मानवतेच्या इतिहासातील एक क्रूर घटना मानली जाते.

दुसऱ्या महायुद्धातील जपानचा पराभव आणि शरणागती

सप्टेंबर १९४० मध्ये जपानने नाझी जर्मनी आणि फॅसिस्ट इटली यांच्यासोबत त्रिपक्षीय करार केला, ज्यामुळे जपान दुसऱ्या महायुद्धात अक्ष शक्तींचा (Axis Powers) भाग बनला आणि मित्रराष्ट्रांच्या विरोधात उभा राहिला. या कराराचा अर्थ होता, संकटाच्या वेळी एकमेकांना मदत करणे. या करारानंतर जपानने फ्रेंच इंडोचायनावर कब्जा केला, ज्यामुळे संतप्त झालेल्या अमेरिकेने जपानवर आर्थिक निर्बंध लादले, ज्यात तेल आणि स्टीलचा पुरवठा थांबवण्यात आला. यामुळे जपानने अमेरिकेविरुद्ध उघडपणे युद्ध करण्याचा निर्णय घेतला. हिरोहितो यांनाही त्यांच्या सरकारचा हा निर्णय योग्य वाटला आणि त्यांनी ७ डिसेंबर १९४१ रोजी पर्ल हार्बरवर बॉम्बहल्ला करून तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला. दुसऱ्या दिवशी अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध घोषित केले, ज्याचा परिणाम जपानवर अण्वस्त्र हल्ले आणि मित्रराष्ट्रांच्या विजयात झाला.

अण्वस्त्र हल्ल्यापूर्वी सात महिन्यांपर्यंत जपानने डच ईस्ट इंडीज, ब्रिटिश सिंगापूर, न्यू गिनी, फिलिपाइन्स आणि दक्षिण-पूर्व आशियासह पॅसिफिकमधील अनेक ठिकाणे यशस्वीपणे ताब्यात घेतली. पण ग्वाडलकॅनालच्या लढाईनंतर परिस्थिती बदलू लागली. १९४४ पर्यंत जपानच्या नेत्यांना समजले की युद्धात विजय मिळवणे सोपे नाही. तरीही हिरोहितो यांनी अण्वस्त्र हल्ल्यापर्यंत युद्ध लढले. हिरोशिमा आणि नागासाकीवरील अण्वस्त्र हल्ल्यानंतर जपानची युद्ध चालू ठेवण्याची शक्ती पूर्णपणे संपली होती. त्यामुळे १५ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोहितो यांनी प्रथमच रेडियो प्रसारणाद्वारे आपल्या देशाला शरणागतीचा निर्णय जाहीर केला. ही घोषणा जपानच्या जनतेसाठी एक धक्का होती, कारण त्यांनी कधीही सम्राटाचा आवाज ऐकला नव्हता.

युद्धानंतरचा पुनर्जन्म आणि नवा जपान

शरणागतीनंतर जपानने अमेरिकेने तयार केलेले नवीन संविधान स्वीकारले, ज्यात सम्राटाची भूमिका फक्त राज्याचे प्रतीक म्हणून मर्यादित राहिली. या नव्या संविधानामुळे सम्राटाची सत्ता असणे किंवा नसणे समान झाले. पण युद्धानंतर हिरोहितो अधिक सक्रिय झाले. त्यांनी आपल्या देशातील लोकांशी जास्तीत जास्त भेटी घेतल्या, त्यांचे दुखः आणि तक्रारी ऐकल्या आणि सार्वजनिकरित्या उघडपणे बोलू लागले. १९४७ मध्ये हिरोहितो यांनी अण्वस्त्र प्रभावित हिरोशिमा येथे भेट दिली आणि सार्वजनिकरित्या अण्वस्त्र हल्ल्यासाठी अमेरिकेची टीका केली. यावेळी त्यांनी युद्धातील आपल्या भूमिकेबद्दल दुःखही व्यक्त केले.

सम्राट हिरोहितो
अणूहल्ला झालेल्या ठिकाणी सम्राटाची भेट 
हिरोहितो यांना नेहमीच हे माहित होते की, त्यांनी इच्छा असती तर बरेच काही थांबवले असते. पण ते इच्छा असूनही काही करू शकले नाहीत आणि ही गोष्ट त्यांना नेहमी सतावत राहिली. आपल्या वादग्रस्त आयुष्याचा नेहमी बचाव करावा लागणाऱ्या हिरोहितो यांनी १९८९ मध्ये इम्पीरियल पॅलेसमध्येच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा अकिहितो याने जपानच्या राजपाटाची जबाबदारी स्वीकारली.

सम्राट हिरोहितो
राखेतून उभ राहणार जपान 
हिरोहितो यांचे जीवन हे केवळ एका सम्राटाचे नसून, जपानच्या एका वादळी काळाचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जपानने युद्ध अनुभवले, विनाश पाहिला आणि त्यातून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा भरारी घेतली. त्यांचे वारसा आजही जपानच्या आणि जगाच्या इतिहासात चर्चेचा विषय आहे. त्यांच्यावर कितीही टीका झाली असली तरी, जपानला पुन्हा उभे करण्यात त्यांची भूमिका नाकारता येणार नाही. एका अर्थाने, ते केवळ एक सम्राट नव्हते, तर एका देशाच्या पुनर्जन्माचे साक्षीदार आणि शिल्पकार होते.
लेख आवडला असल्यास लाईक नक्की करा.


टिप्पण्या